लातूर : प्रतिनिधी
‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ च्या नावाखाली भांडवलदारांना उद्योग करताना कामगारांचे अधिकाधिक शोषण करून अधिक नफा वसूल करता यावा या उद्देशाने आजपर्यंत संघर्ष करून मिळविलेले वेगवेगळे कामगार कायदे रद्द करून नवीन चार कामगार कायदे केंद्रातील मोदी सरकारने आणलेले आहेत. या कायद्यांच्याविरोधात दि. १२ फेबु्रवारी रोजी सरकारी, निमसरकारी कर्मचारी, बँकांतील कर्मचारी, कामगारांनी एल्गार पुकारला. कामगार रस्त्यावर उतरले. धरणे सत्यागृह, मोर्चाने लक्ष वेधले.
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेकडून मोर्चा काढून निषेध करण्यात आला. गुरुवारी सकाळी शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकातून मोर्चा निघाला. गंजगोलाई, मेन रोडमार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कामगारविरोधी व कार्पोरेट धार्जिण्या, मालक धार्जिण्या चार श्रमसंहिता त्वरीत रद्द करा, कामगारांच्या बाजूने असलेले जूने सर्व कायदे पुन्हा प्रस्थापीत करुन त्याची कडक अंमलबजावणी करावी, यासह इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
कामगार नेते राजकुमार होळीकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात प्रा. सूधीर अनवले, बसवंतप्पा उबाळे, पांडूरंग देडे, शिवाजी भंडारे, सुरेश काटे, प्रमोद बानाटे, मन्मथ वत्ते, अंकुश टकळगे, महेंद्र कांबळे, नेताजी बनसोडे, चंद्रपाल गिरी, हमीद शेख, बळीराम कांबळे, भागवत पांचाळ, रेणुका कांबळे, शीलाताई भोळे,
सुलताना बागवान, मीरा टिळक, माया कांबळे, ललिता कांबळे, छाया सातपूते यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
देशाची चाके थांबवण्याची ताकद कामगारांमध्ये
कुठल्याही क्षेत्रातील कामगारांनी या कामगार कायद्यांची मागणी केलेली नाही तसेच प्रत्येक क्षेत्रातून या नवीन कामगार कायद्यांना विरोध होतो आहे, तरीसुद्धा केवळ भांडवलदारांना व परकीय गुंतवणुकीला येथील उद्योगांमध्ये कामगारांचे शोषण करून अधिकाधिक नफा मिळविता यावा केवळ या एका उद्देशाने सरकारने देशभरातील सर्व संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारावरती हे कायदे लादलेले आहेत. कामगार विरोधी असलेले हे कायदे तात्काळ भारत सरकारने मागे घ्यावे अन्यथा कामगार वर्गास भारतातील प्रत्येक क्षेत्राची चाके थांबविण्याची क्षमता नाईलाजाने वापरावी लागेल हे शासनाने ध्यानात घ्यावे, असा इशारा बँक कर्मचा-यांचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिला. यावेळी बँक कर्मचा-यांचे युवा नेते कॉ. दीपक माने, विमा क्षेत्रातील कर्मचा-यांचे नेते कॉ. कमलाकर एचवाड, कॉ. परमेश्वर बडगिरे, कॉ. कलीम पठाण, कॉ. महेश गांधले, कॉ. सदाशिव मुगावे यासह लातूर शहर व परिसरातील बँकिंग व विमा क्षेत्रातील शंभर पेक्षा अधिक कर्मचारी उपस्थित होते.

