बंगळुरू : वृत्तसंस्था
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी जर काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा केंद्रातील सत्तेत आला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशभरात बंदी घातली जाईल, अशी घोषणा केली आहे.
देशात कोण द्वेष पसरवत आहे, कोण घटना बदलण्याचे इशारे देत आहे, अशा शब्दात प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, संघ आपली राजकीय शाखा असलेल्या भाजपाला देशात बेरोजगारी का वाढत आहे? पहलगाम येथे दहशतवादी हल्ला कसा झाला? हे का विचारत नाही. आता आम्ही केंद्रात सत्तेत आलो की, कायदेशीर प्रक्रियेंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालू, असे ते म्हणाले.
प्रियांक खर्गे पुढे म्हणाले की, ईडी, प्राप्तिकर विभाग आणि इतर सर्व तपास यंत्रणा ह्या केवळ विरोधी पक्षांवरच कारवाया करण्यासाठी आहेत का? सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चौकशी का करत नाही. त्यांच्याकडे पैसा कुठून येतोय. त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय? याची चौकशी का केली जात नाही. संघाचे लोक नेहमीच द्वेषपूर्ण भाषणे आणि घटना बदलण्याचे दावे केल्यानंतरही कसे काय सुटतात, आर्थिक गुन्ह्यांमधून कसे वाचतात, याचीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही प्रियांक खर्गे यांनी केली.