सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले होते. मात्र हेच दोन नेते लोकसभा निवडणुकीनिमित्त एकत्र आले असून तब्बल पंधरा वर्षांनंतर मंत्री राणे हे केसरकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
आमच्यात कोणताही वैयक्तिक वाद नव्हता, वैचारिक मतभेद होते, असे म्हणत केसरकर-राणे वादावर पडदा पडला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार प्रचार सभा तसेच गाठीभेटी घेत आहेत. रविवारी सावंतवाडी तालुक्यात मंत्री राणे दाखल झाल्यानंतर प्रथम ते मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी केसरकर यांनी कार्यकर्त्यांसह त्याचे स्वागत केले. राणे २००९ मध्ये काँग्रेसमध्ये असतना तत्कालीन खासदार निलेश राणे यांच्या प्रचार दौ-यावेळी केसरकर यांच्या ‘श्रीधर’ निवासस्थानी भेट घेतली होती.
त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी असल्याने दोघांनी प्रचार यंत्रणा राबविली होती. आणि त्या निवडणुकीत निलेश राणे निवडूनही आले होते. पण नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत केसरकर हे निवडून आल्यानंतर निधी वाटपावरून केसरकर-राणे यांच्यात वाद झाला होता. हा वाद पुढे विकोपाला गेला. आव्हान- प्रतिआव्हानही देण्यात आले. अशातच दोघांतील संबंध ताणले होते.
त्यातच २०१४ मध्ये निलेश राणे यांचा प्रचार करावा लागतो म्हणून केसरकर हे थेट शिवसेनेत गेले होते. तर २०१९ मध्ये राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तरीही दोघांतील विळ्या-भोपळ्याचे सख्य काही केल्या संपले नव्हते. मात्र मध्यंतरी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर राणे व केसरकर एकत्र आले होते. त्यांच्यातील मनोमिलनानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण बदलणार हे निश्चित होते. त्यातच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून नारायण राणे यांचे नाव आघाडीवर आहे.
त्यामुळे राणे हे मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवत आहेत. अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर राणे हे सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी सर्वांत प्रथम केसरकर यांच्या श्रीधर निवासस्थानी भेट दिली. या भेटीवेळी केसरकर यांनी राणे यांचे कार्यकर्त्यांसह स्वागत केले तसेच त्यांचे आदरातिथ्यही केले. २००९ नंतर प्रथमच राणे हे केसरकर यांच्या निवासस्थानी आल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सिंधुदुर्गच्या राजकारणात हा चर्चेचा विषय बनला असून राणे यांनी तब्बल पंधरा वर्षांनंतर केसरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे.
















