पुणे : प्रतिनिधी
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे
ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली.
पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविलेल्या आजवरच्या पुरस्कारार्थींच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा इंग्रजी ग्रंथ तयार करण्यात आला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होईल.
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये,असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सन १९८३ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.

