लातूर : प्रतिनिधी
इंडियन बँक्स असोसिएशन आणि बँक कर्मचारी, अधिकारी संघटना यांच्यामध्ये करारानुसार पाच दिवसांचा आठवडा मान्य होऊन दोन वर्षे उलटली तरीही मोदी सरकारने अद्याप याला मान्यता दिलेली नाही. संसदेतील पाशवी बहुमताची घमेंड जर या सरकारला येऊन भाजपच्या नेहमीचा जुमला करू अशी मस्ती या सरकारला आली असेल, तर ती मस्ती जिरवण्याची ताकद बँक कर्मचारी, अधिकारी बाळगून आहेत. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, असा संतप्त सवाल बँक कर्मचा-यांचे नेते कॉ. उत्तम होळीकर यांनी विचारला.
मंगळवारी देशभरातील सर्व बँकांतील सर्व संघटनांचे कर्मचारी यांनी राष्ट्रव्यापी संप पुकारला होता. त्या निमित्त लातूरच्या स्टेट बँकेसमोर सर्वांनी सरकारच्या गर्विष्ठ पणावर राग व्यक्त करीत सरकार विरोधात संतप्त निदर्शने केली. त्यावेळी पुढे बोलताना कॉ. उत्तम होळीकर म्हणाले, पाशवी बहुमताची मोदी सरकारला घमेंड चढली आहे. गेली ११ वर्षे देशवासीयांना जुमला करून या सरकारने मूर्ख बनविले आहे. तसाच प्रकार आता ते बँक कर्मचारी अधिकारी यांचे सोबत करीत आहे पण या सरकारने हे लक्षात घ्यावे की यांची गाठ आमच्याशी आहे.
पाच दिवसांचा आठवडा तर मिळवूच पण येत्या १ फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थसंकल्पात हे सरकार मॉनिटायझेशन या नावाने देशाची संपत्ती कोण, कोणत्या अडाणी, अंबानी यांना विकणार आहे, बँकिंग गव्हर्नन्स बील या नावाने बँकांचे समिलीकरण, खाजगीकरण करणार याचेवर लक्ष ठेवून रहा. हे विधेयक येताच लाईटनिग कॉल वरती आपणास संप करावयाचा आहे आणि देश मोदी सरकारच्या हल्ल्यातून वाचवायचा आहे, हे लक्षात घ्या. हे सरकार मताला आणि सत्तेला घाबरते म्हणून या सरकारची दुखरी नस ओळखा आणि पूर्ण ताकदीचा संघर्ष जो उभा राहील, त्यात देशहितासाठी झोकून द्या, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
यावेळी बँक कर्मचा-यांचे तरुण नेते कॉम्रेड दीपक माने, ग्रामीण बँक कर्मचा-यांचे नेते कॉ. सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. युनायटेड फोरमने देशभरामध्ये २७ जानेवारी रोजी संपाची हाक दिलेली आहे. यावेळी सचिन नंदागवळे, अंजली स्वामी, परमेश्वर बडगिरे, अनुप देशमुख, स्वप्निल जाधव, राजू दुलेवाड ,सचिन एकोरगे, रेश्मा भवरे, महेश गांधले, प्रीतम गिरी गोसावी यांच्यासह लातूर शहर व परिसरातील दोनशे ते तीनशे बँक कर्मचारी उपस्थित होते.

