पुणे : पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुलाच्या हत्येप्रकरणी निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केल्यानंतर संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी केतन अग्रवाल (२६) याचा लोहगड किल्ल्यावर मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्याची मंगेतर सिया गोयल (१९), तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी आणि चेतनचा मित्र रितेश संजय हांगे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. केतनला किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
















