19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसंपादकीयकेरळमध्ये निसर्ग प्रकोप

केरळमध्ये निसर्ग प्रकोप

केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटना घडल्यामुळे किमान १४३ जण ठार झाले असून ४०० जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. वायनाडमध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ४ वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन झाले. रात्री २ ते पहाटे ६ पर्यंत झालेल्या या भीषण नैसर्गिक आपत्तीत मुंडक्कई, चुरलमाला, अट्टामाला व नुलपुझा ही चार गावे वाहून गेली. डोंगराळ भागातील या गावांत दरडी कोसळल्या. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी इर्शाळवाडी व तळीये ही गावे ज्याप्रमाणे दरडीखाली दबली गेली काहीशी तशाच प्रकारची स्थिती याही दुर्घटनेत झाली. केरळमध्ये गत काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू होता.

मंगळवारी रात्री त्यात अधिकच वाढ झाली. डोंगराळ भागातून कोसळणा-या पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात दगड व माती वाहून आली. त्यात अनेक घरे पाण्याबरोबर वाहून गेली. लोकांना वाचण्याची संधीच मिळाली नाही. काही घरांवर दरडी कोसळल्या. डोंगरातून येणा-या पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की दुर्घटनेत वाहून गेलेले मृतदेह मल्लमपूर जिल्ह्यातील नदीत सापडले. एनडीआरएफ, लष्कर यांच्यासह राज्य आपत्ती निवारण दलाने मदतकार्य सुरू केले. मुंडक्कई भागाला जोडणारा चुरलमाला येथील पूल वाहून गेल्याने अनेक अडचणी आल्या. हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने हेलिकॉप्टरचाही वापर करता आला नाही. डोंगराळ भागातील अनेक गावांमधील घरांवर दरडी कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. डोंगराळ भागातील अनेक मृतदेह नदीत वाहून आले तर काही चिखलात फसले. रस्त्यावरही चिखल व दगड-मातीचे ढिगारे आले, त्यामुळे मदतकार्यात अडथळे आले.

वायनाडच्या मुंडक्कई गावाचे भूस्खलनात मोठे नुकसान झाले आहे. चुरलमालाला जोडणारा पूल वाहून गेल्याने येथे बचावकार्य करणे कठीण झाले. मुंडक्कईत २५० लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेथे ६५ कुटुंबे राहतात. मुंडक्कई येथे रस्त्याने जाणे शक्य नाही. मोबाईल नेटवर्क ठप्प झाले आहे. चुरलमाला गावाचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरे वाहून गेली आहेत. दोन परदेशी नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. चुरलमाला येथे जखमींवर उपचार करण्यासाठी मशीद, मदरशामध्ये तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले आहे. केरळ सरकारने या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूस्खलनात मृत्यू पावलेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला असून दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. वायनाडमधील भूस्खलनाबाबत असे सांगितले जाते की वायनाड हा केरळचा एकमेव पठारी भाग आहे. २०२१ च्या भारतीय भूगर्भ संस्थेच्या अहवालानुसार केरळचा ४३ टक्के भाग हा भूस्खलनात मोडतो. वायनाडची ५१ टक्के जमीन ही उताराची आहे.

त्यामुळे तेथे कायम भूस्खलनाची समस्या उद्भवते. वायनाडचे पठार पश्चिम घाटात ७०० ते २१०० मीटर उंचीवर आहे. मान्सून पश्चिम घाटावर धडकतो. त्यामुळे वायनाडमध्ये जोरदार पाऊस होतो. या भागात नद्यांना पूर आल्याने मोठे नुकसान होते. नयनरम्य हिरवाईने नटलेल्या वायनाड जिल्ह्यावर मंगळवारी निसर्ग अक्षरश: कोपला. नैसर्गिक आपत्तीत शेकडो लोक दगड-माती-चिखलाच्या ढिगा-याखाली गाडले गेले. डोंगरावरून आलेल्या दगड-मातीच्या लोंढ्याखाली गावेच्या गावे गडप झाली. जे काही वाचले ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. झोपेत असतानाच काळाने घाला घातल्याने लोकांना सावध होण्याची संधीच मिळाली नाही. युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवण्यात येत असली तरी मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. ढिगा-याखाली गाडल्या गेलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. वायनाडमध्ये घडलेल्या घटनेने महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या दोन मोठ्या भूस्खलनांचे स्मरण होते.

भूस्खलन केव्हा आणि कसे धोकादायक ठरेल ते सांगता येत नाही. नैसर्गिक आपत्तीसमोर माणसाचे फारसे काही चालत नाही हे खरे असले तरी गैरनियोजन, गैरव्यवस्थापन या समस्या आपल्यासमोर मोठ्या आपत्ती स्वरूपात उभ्या आहेत त्याचे काय? एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्याबाबत उपाययोजना करणे जसे आवश्यक ठरते तसे भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक ठरते. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नियोजन आणि व्यवस्थापनाचे गांभीर्यच लक्षात घेतले जात नाही. गैरनियोजन आणि गैरव्यवस्थापन याच मोठ्या आपत्ती असल्यासारखे चित्र आज आहे. दुर्घटना घडल्यानंतर मदतीसाठी यंत्रणा सज्ज असणे हा देखील पूर्वनियोजनाचा एक भाग ठरतो. पण समस्या किंवा दुर्घटना टाळण्यासाठी जे प्रयत्न होतात त्याला नियोजन आणि व्यवस्थापन म्हटले जाते. एकूणच सरकारी स्तरावरची ही उदासिनता अनेक समस्यांना आमंत्रण देणारी ठरते. याचे भान ठेवून नियोजन केले तर कितीतरी समस्या टाळता येऊ शकतात.

ज्या वेगाने शहरांची वाढ होते आहे त्या वेगाने एकूणच पर्यावरणाचा तोल बिघडतो आहे. वारेमाप बांधकामांमुळे होणारी वृक्षतोड अथवा जंगलतोड, जमिनीची होणारी धूप अशा कारणांमुळे सुद्धा भूस्खलनासारख्या घटना घडतात. शहरांना लागून असलेले छोटे डोंगर, टेकड्या पोखरून उद्ध्वस्त केल्या जात आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा होणारा निचरा भूस्खलनाच्या मार्गाने घडून येताना दिसतो. पावसाळा म्हटला की त्याचा लहरीपणा किंवा त्याचे धूमशान कुठे ना कुठे पहायला मिळणारच. पूर्वी महापूर, चक्रीवादळ अथवा अतिवृष्टी आदी प्रकार तुलनेने कमी व्हायचे. याचे मुख्य कारण म्हणजे माणसाने निसर्गाला अडकाठी केलेली नव्हती. अलिकडे अडकाठीचे प्रकार सातत्याने वाढत चालले आहेत त्यामुळे निसर्गही आता काठी उगारतो आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR