30 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeलातूरकेवळ ४० टक्के निधी खर्च होणे ही गंभीर बाब; रखडलेल्या विकास कामांना तातडीने गती...

केवळ ४० टक्के निधी खर्च होणे ही गंभीर बाब; रखडलेल्या विकास कामांना तातडीने गती द्या 

लातूर : प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीपैकी आतापर्यंत केवळ ४० टक्केच निधी खर्च झाला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाने कामाचा वेग वाढवून उर्वरित निधीचा तातडीने विनियोग करावा. विकासकामात पारदर्शकता आणि दर्जा राखत, निधीअभावी रखडलेल्या योजनांना प्राधान्याने गती द्या, अशी आग्रही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिका-यांच्या उपस्थितीत बुधवार दि. ११ फेब्रुवारी २६ रोजी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपस्थित राहिले यावेळी ते बोलत होते. यावेळी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, खासदार ओमराजे निंबाळकर, तसेच माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील  निलंगेकर, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, नियोजन समितीतून मंजूर असलेल्या निधी पैकी आतापर्यंत फक्त ४० टक्केच निधी खर्च झाल्याची बाब गंभीर असून, कामाला गती देऊन उर्वरित निधीचा तातडीने विनियोग करावा. एकूण निधी वाटपात आणि योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवून दर्जेदार कामे करावीत. जिल्ह्यात निधीअभावी रखडलेल्या योजनांना निधीचा पुरवठा करून कामांना गती द्यावी.
बैठकीत पूढे बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, लातूर येथे उभारावयाचे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व ८० फुट उंचीच्या पुतळ्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी. तसेच लोकसभेचे माजी सभापती, माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकासाठी निधीची, उपलब्धता करून द्यावी, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील तसेच माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारकासही मंजुरी देण्यात यावी. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लातूर येथे उभारावयाच्या माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मारकासंबंधी घोषणा केली होती, त्या घोषणे प्रमाणे स्मारक उभारणीला निधी मंजूर करून गती द्यावी.
अत्यंत गतीने विकसित होत असलेल्या लातूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी, नवीन बा वळण रस्त्याला यापूर्वीच मंजुरी दिलेली असून, या रस्त्यासाठी ८० टक्के जमिनीचे संपादन झाले  आहे.  उर्वरित २० टक्के जमीन संपादनासाठी या महिन्यात होणा-या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून द्यावा. लातूर रेल्वेस्टेशन आणि विमानतळाकडे जाणा-या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याच्या दृष्टीने जमीन संपादनासाठीही या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून द्यावा. अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एकात्मिक कार्यक्रमाची आखणी करून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यातील अनेक विकास योजना तसेच जलजीवन मिशनच्या योजना निधीअभावी रखडल्या आहेत, या कामांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा.
बारामती येथे झालेल्या विमान अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता लातूर विमानतळही ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे’ हस्तांतरित करावे, अशी मागणी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. या प्रमुख मागण्यांसह इतर विविध प्रकल्प तसेच शासकीय योजनांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आदी मागण्यांची निवेदनेही लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आमदार देशमुख यांनी दिली आहेत. प्रारंभी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाबद्दल त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प अर्पण करून दोन मिनिटे स्तब्ध राहून सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR