तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव शिवारात शनिवारी दुपारी घडलेल्या भीषण विद्युत अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. बोअरमधील मोटार काढण्याचे काम सुरू असताना कप्पीचा महावितरणच्या जिवंत विद्युत तारेस स्पर्श झाल्याने दोन पितापुत्रांसह चार जणांचा तीव्र विद्युत धक्क्याने जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे केशेगाव व परिसरात शोककळा पसरली आहे.
ही घटना शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. केशेगाव येथील शेतकरी गणपती साखरे यांच्या शेतातील बोअरमधून मोटार बाहेर काढण्यासाठी कप्पीच्या सहाय्याने काम सुरू होते. याच दरम्यान कप्पीचा अचानक महावितरणच्या जिवंत विद्युत तारेस स्पर्श झाला आणि काम करणारे सर्वजण विजेच्या प्रवाहाच्या कचाट्यात सापडले.
या अपघातात काशिम कोंडीबा फुलारी (वय ५४), रतन काशिम फुलारी (वय १६),
नागनाथ काशिनाथ साखरे (वय ५५) आणि रामलिंग नागनाथ साखरे (वय ३१) सर्व रा. केशेगाव, ता. तुळजापूर,
यांचा जागीच मृत्यू झाला.

