नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती आखण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या रणनीतीमध्ये समन्वय राखण्यासाठी विभागनिहाय निरीक्षकांची घोषणा करण्यात आली. यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना नियुक्त केले आहे.
काँग्रेसने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागनिहाय निरीक्षकांची नियुक्ती केली. यामध्ये मुंबई आणि कोकण विभागाची जबाबदारी ही अशोक गहलोत आणि जी. परमेश्वरा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विदर्भ विभागाची जबाबदारी भूपेश बघेल, चरणजीत स्ािंग चन्नी आणि उमंग सिंघर यांच्याकडे सोपविण्यात आली. मराठवाड्याची जबाबदारी सचिन पायलट आणि उत्तम कुमार रेड्डी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी टी. एस. सिंहदेव आणि एम. बी. पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी ही सईद नासीर हुसेन आणि डी. अनसुया सीताक्का यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मागच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने ४४ जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात १३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता महाराष्ट्रात विधानसभेच्या अधिकाधिक जागा ज्ािंकण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू आहे.