जालना : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका महाविद्यालयाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगा-याखाली अडकून एका मजुराचा मृत्यू झाला तर चौघेजण जखमी झाले. भोकरदन शहरातील अन्वा रोडवरील राजकुंवर महाविद्यालयाचा शुक्रवारी सायंकाळी स्लॅब कोसळल्याची घटना घडली. जखमींवर भोकरदन आणि जालना येथे उपचार सुरू आहेत.
महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळल्याने मोतीलाल रामजी मिरगे (५०, रा. मुठाड, ता. भोकरदन) यांचा मृत्यू झाला तर कृष्णा नामदेव हिरे (३०, रा. दगडवाडी), कृष्णा विठ्ठल शिंदे (४०, रा. वाकडी), फारुख खा शारूख खा (३८, रा. दानापूर) आणि लक्ष्मण गणेश ठोंबरे (३०, रा. सुरंगळी) हे चौघे जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, बांधकामावरील इतर कामगार आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. नागरिकांनी ढिगा-याखाली अडकलेल्या मजुरांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढले.
















