अहिल्यानगर : प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील ऊसतोड कामगाराच्या मुलीवर आणि येसगाव येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. याच नरभक्षक बिबट्याला आता वन विभागाने मोठ्या प्रयत्नांनंतर ठार केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्याने हैदोस घातला होता. त्यामुळे या बिबट्याला ठार करण्यात यावे या मागणीसाठी लोकांनी आंदोलन सुद्धा केले. त्यानंतर ४ नोव्हेंबरला वन विभागाच्या शार्प शूटर्सनी त्याला ठार केले. या घटनेनंतर पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यांत अनेक बिबटे पाहण्यात आले. शुक्रवारी (ता. १४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये नागरी वस्तीत शिरलेल्या एका बिबट्याला चार तास लागले. लोकांनी भरदिवसा हा चार तासांचा थरार अनुभवला.
बिबट्यांचा नागरी वस्तीत वावर वाढल्याने आता त्यांना आवर घालण्याचे मोठे आव्हान वन विभागाकडे आहे. पण एखादा नरभक्षक बिबट्या आहे, अशी माहिती कळताच किंवा एखादा संशयास्पद बिबट्या वाटताच त्याला ठार करा, असे आदेशच वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत, अशातच आता नगर जिल्ह्यातील कोपरगावात नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील ऊसतोड कामगाराच्या मुलीवर आणि येसगाव येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्याशिवाय या नरभक्षक बिबट्याने शिंगणापूरमध्ये एका मुलाला गंभीर जखमी केले होते. पशुधन, पाळीव प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात मारले असल्याने शेतक-यांचा संताप वाढला होता.
यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वनविभागाने कोपरगाव तालुक्यात मोठी शोधमोहीम हाती घेतली होती. बिबट्याला पकडण्यासाठी १०० हून अधिक वन कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. टाकळी, येसगाव, ब्राह्मणगाव परिसरात १५ पिंजरे लावण्यात आले होते. नाशिक आणि पुणे येथून विशेष पथके बोलावण्यात आली होती. २ शार्प शूटर्स आणि तीन ड्रोन कॅमे-यांचा वापर करून शोधमोहीम सुरू होती.

