पुणे : प्रतिनिधी
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ‘कोयता गँग’ अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील कोयता गँगचा व्हीडीओ ट्वीट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
खासकरून पुणे शहरात अधूनमधून कोयता गँगची दहशत पाहायला मिळते. मात्र नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ‘कोयता गँग’ अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच माध्यमांनी हे नाव दिल्याचा दावाही फडणवीस यांनी केला होता. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील कोयता गँगचा व्हीडीओ ट्वीट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
रोहित पवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, पुण्यातल्या कोयता गँगचा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. मात्र तेव्हा सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते. पण हा बघा कोयता गँगचा कालचा थरार. पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.
दोन गटांत अचानक हाणामारी
रोहित पवारांनी शेअर केलेला सीसीटीव्ही व्हीडीओ पुण्यातील बिबवेवाडी भागातील आहे. या व्हीडीओमध्ये दिसते की, वर्दळीच्या रस्त्यावर काही तरुण गर्दी करून उभे आहेत आणि दोन गटांत अचानक हाणामारी सुरू होते. त्यावेळी एका गटातील तरुण कोयता काढून समोरच्या व्यक्तीवर वार करताना दिसत आहे. यावेळी दोन्ही गटांतील तरुण एकमेकांवर दगड आणि कोयता यासारख्या वस्तूंनी मारहाण करताना दिसत आहेत.