कराड : प्रतिनिधी
पश्चिम घाटमाथा, कोयना पाणलोटक्षेत्र आणि कृष्णा-कोयना नद्यांच्या काठांवर गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे आता आणखी उचल घेतल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या या धडाक्यामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना गती मिळाली असून, शेतशिवार गजबजले आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाचा जलसाठा गतवर्षीच्या आणि आजवरच्या तुलनेत अद्यापही लक्षणीयरीत्या कमी आहे. असे असले तरी, गेल्या २४ तासांत झालेल्या तुफान पावसामुळे धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढली असून कोयना धरण आता एक तृतीयांश भरण्याच्या मार्गावर पोहोचले आहे.
कोयना पाणलोटात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात ३२४.६६ मिमी म्हणजेच तब्बल १२. ७८ इंच आणि वार्षिक सरासरीच्या साडेसहा टक्के पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा, कोयना, वारणा या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. घाटांमध्ये दरडी कोसळणे, नावली भागात भूस्खलन आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे पाचवड फाटा व कोल्हापूर नाक्यावर वाहतुकीची कोंडी झाली असून, रस्ते जलमय झाले आहेत. मोरणा-गुरेघर धरण ६२ टक्के भरून ओसंडून वाहू लागले आहे, तर ठोसेघर आणि वजराई धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. काही ठिकाणी पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की तेथील खरीप हंगामाच्या पेरण्या, टोकण्यांसह शेतीच्या मशागतीची कामेही बंद ठेवावी लागली आहेत.
















