मुंबई : प्रतिनिधी
राज्यासह देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यात कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
सध्याच्या परिस्थितीत कोविडसाठी राज्यात आयएलआय आणि एसएआरआय सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत. जानेवारी २०२५ पासून १२ हजार ११ रुग्णांची कोविड चाचणी केली असून, त्यापैकी ८७३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जानेवारी २०२५ पासून मुंबईमधील एकूण रुग्णसंख्या ४८३ असल्याचे दिसून आले.
दरम्यान, सध्या नियमित सर्वेक्षण सुरू आहे. फ्लूसदृश आजार व श्वसनासंबंधित समस्या असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण सुरू आहे. तसेच तीव्र श्वसनदाह असलेल्या सर्व रुग्णांचे कोविड-१९ या आजारासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. तसेच फ्लूसदृश आजार असलेल्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. सर्व आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेले नमुने संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात.
देशभरात ३१ मृत्यू
दुसरीकडे, कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. मागील चार दिवसांमध्ये देशभरामध्ये तब्बल ३१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने देशातील आणि विविध राज्यांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर आणली आहे.