लातूर : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या जागतिक संकटादरम्यान राज्याचे तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि लातूर जिल्ह्राचे पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याची विशेष काळजी घेतली. महामारीच्या काळात पहिल्या लाटेच्यावेळी ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ लातूरमध्ये थांबून नागरीकांना कोरोना उपचार व इतर सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून प्रत्येक नागरीकाला सोयीसुवीधासाठी सर्व यंत्रणात समन्वय राखला. त्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले. ही वस्तुस्थिती असताना विरोधी पक्षाची नेते मंडळी लातूर महानगरपालिका निवडणुक काळात खोटारडे, बिनबुडाचे आरोप करुन जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करित आहेत. लातूरचे सुजाण नागरीक विरोधकांच्या भुलधापांना, अफवातंत्रास बळी पडणार नाहीत, असा विश्वास लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी पक्षाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोविड-१९ ची सुरवात महाराष्ट्रात सन २०२० च्या सुरवातीच्या काळात झाली. त्यावेळी वेद्यकीय शिक्षणमंत्री असलेल्या आमदार अमित विलासराव देशमुख यांनी अत्यंत जलद गतीने निर्णय घेत संपुर्ण महाराष्ट्राला सुरक्षित करण्याचे प्रयत्न केला. राज्यात कोरोना तपासणी योग्य फक्त तीन प्रयोगशाळा होत्या. काही महिन्यात त्या प्रयोगशाळांची संख्या त्यांनी एक हजारावर नेली. २० वैद्यकिय महाविद्यालयांचे कोवीड समर्पित रुग्णालयात रुपांतर केले. तेथे ८ हजार ऑक्सीजनचे बेड तर तीन हजार व्हेटीलेटरचे बेड निर्माण करुन लाखो गंभीर रुग्णांचे प्राण वाचवले. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपुर्ण कोरोना काळात सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लातूरमध्ये राहुन सुपर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची काळजी घेतली आणि लातूरची तर विशेष काळजी घेतली. लातूर जिल्ह्राला कोरोना मुक्त ठेवण्यासाठी सुरवातीपासूनच प्रभावी नियोजन केले. त्यामुळे पहिल्या लाटेत लातूर जिल्हयाला फारसा त्रास झाला नाही. आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर येथे अगोदरच बांधून तयार असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोविड-१९ रुग्णांच्या उपचारासाठी ताब्यात घेऊन तेथे कोविड-१९ डेडिकेटेड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
लातूर येथे तातडीने १० केएल क्षमतेच २ व २० केएल क्षमतेचे २ ऑक्सिजन टँक उभारले. यामूळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले. जिल्ह्यात जवळपास १४ शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी व इतर सोयी-सुविधा तातडीने उभारण्याचा निर्णय घेतला. प्रारंभीच्या काळात लातूर आणि उदगीर येथे आरटीपीसीआर प्रयोगशाळेची उभारणी केली. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय महाविदयालय सुपरस्पेशालीटी हॉस्पिटलसह अद्ययावत करण्यासाठी जवळपास २२१ कोटी रुपये खर्चून सुविधा उभारल्या. लातूर येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने उभारण्यात आलेली १ हजार बेडची क्षमता असलेले सुसज्ज वसतिगृहे अधिग्रहित करून त्याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले.
या काळात अनेक निर्णय तातडीने घेतल्यामुळे कोविड- १९ रुग्णांवरील उपचार सुलभतेने होऊन मृत्यूचे प्रमाण कमी करता आहे. या काळात लातूर येथील कोविड- १९ डेडिकेटेड रुग्णालय आणि कोविड- १९ केअर सेंटर येथे मिळालेल्या सोयी-सुविधांचे तर राज्यभर कौतुक झाले. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी व्यवस्था उभारल्या. जिल्ह्रातील २२ लाख लोकांपर्यंत अन्नधान्य पुरविणे, शेतीमालाची वाहतूक आणि विक्री निर्धोकपणे होईल यासाठी त्यांनी बारकाईने लक्ष दिले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोविड- १९ ची लागण झालेल्या प्रत्येक रुग्णाला आपल्या संपर्क कार्याललयातून फोन करुन त्यांची विचारपूस करण्याचे काम दररोज सुरु होते. यात अडचण सांगणाया रुग्णाला आवब्यक ती मदत तातडीने पोहोचविण्याची दक्षता घेतली. लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे अन्नक्षत्र सुरु करुन शहरातील रुग्णालयात दाखल झालेले सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवण पुरविले. या सर्व यंत्रणावर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे त्यावेळी लक्ष होते. हे संपुर्ण लातूरकरांनी अनुभवलेले आहे. ही वस्तुस्थिती असताना काही स्थानिकची व काही बाहेरची मंडळी खोटीनाटी वक्तव्य करुन जनतेची दिशाभुल करु पाहतायत. लातूरची जनता त्यांना योग्य धडा शिकविल, असा विश्वास अॅड. किरण जाधव यांनी या पत्रकाच्या माध्यामातून व्यक्त केला आहे.

