23.5 C
Latur
Thursday, January 15, 2026
Homeराष्ट्रीयकोलकात्यात फुटबॉलपटू मेस्सीच्या कार्यक्रमात राडा

कोलकात्यात फुटबॉलपटू मेस्सीच्या कार्यक्रमात राडा

मेस्सीने दाखविली झलक, चाहत्यांकडून स्टेडियमची तोडफोड
कोलकाता : वृत्तसंस्था
फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी आज भारत दौ-यावर आला. कोलकात्यात त्याचे भव्य स्वागत झाले. त्यानंतर सॉल्ट लेक स्टेडियममध्ये तो दाखल झाला. प्रारंभी सन्मान सोहळा पार पडला. त्यानंतर काही वेळातच मेस्सी स्टेडियममधून निघून गेला. मुळात मेस्सीला पाहण्यासाठी स्टेडियमवर मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. त्याला पाहण्यासाठी अनेकांनी हजारो रुपये मोजून तिकीट काढले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली आणि खुर्च्या, बाटल्या फेकल्या. त्यामुळे मैदानात एकच गोंधळ उडाला. स्टेडियमला युद्धभूमीचे स्वरूप आले. अखेर गोंधळ थांबविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

सुरुवातीला संपूर्ण कोलकाता मेस्सीच्या स्वागतात मग्न होता. पण जसजसा दिवस पुढे सरकत गेला, तसतशी परिस्थिती बदलत गेली. साल्ट लेक स्टेडियमवर अभूतपूर्व गोंधळ उडाला. तिकिटे खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करूनही अनेक चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूला पाहू शकले नाहीत. मेस्सीही नियोजित वेळेपूर्वी मैदान सोडून गेला. यामुळे मेस्सीच्या चाहत्यांचा संताप वाढला आणि स्टेडियम युद्धभूमी बनले. बाटल्या फेकण्यात आल्या, खुर्च्या फेकण्यात आल्या आणि शेकडो लोक कुंपण तोडून मैदानात घुसले. स्टेडियमला ​​आगही लावली. पोलिसांनी लाठीमार केला, पण परिस्थिती नियंत्रणात आली नाही. सुरक्षा कर्मचारी असहाय्य दिसत होते. अखेर मुख्य आयोजक सतद्रू दत्ता यांना अटक केल्याने चाहत्यांचा राग काहीसा कमी झाला.

या प्रकरणी साल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या लिओनेल मेस्सीच्या फुटबॉल कॉन्सर्टचे मुख्य आयोजक सताद्रू दत्ता यांना पोलिसांनी अटक केली. कार्यक्रमाच्या गैरव्यवस्थापनाच्या आरोपाखाली दत्ता यांना कोलकाता विमानतळावर अटक करण्यात आली, जिथे ते मेस्सी आणि इतरांना हैदराबादला जाण्यासाठी निरोप देण्यासाठी गेले होते. या प्रकरणी पोलिस विभागाने कठोर कारवाईचे आश्वासन दिले. प्रेक्षकांना त्यांचे तिकीट परत मिळावेत, असेही सांगण्यात आले.

चौकशीसाठी समिती
मैदानावरील राड्याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. न्यायमूर्ती (निवृत्त) असीमकुमार रे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीची घोषणा केली. गृह विभागाचे मुख्य सचिव आणि पर्वतीय व्यवहार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव या समितीचे सदस्य असतील. समिती या घटनेची सविस्तर चौकशी करेल, असे त्यांनी सांगितले.

मेस्सीची माफी मागितली
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे झालेल्या फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमातील गैरव्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दुर्दैवी घटनेबद्दल मी लिओनेल मेस्सी, त्यांचे चाहते आणि सर्व क्रीडाप्रेमींची नम्रपणे माफी मागते, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR