कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीची चर्चा होत असतानाच आता निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही, असे उमेदवारांनी थेट स्टॅम्प पेपरवरच लिहून दिले आहे. त्याची राज्यभर चर्चा सुरू आहे.
राज्यभरातील महापालिका निवडणुकांची लगीनघाई आता जवळ आली आहे. सध्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. तर निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात करत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. कोल्हापुरात राजर्षी शाहू आघाडी कुणा-कुणाची विकेट पाडणार याकडे लक्ष असतानाच आम आदमी पक्षाचा अनोखा जाहीरनामा चर्चेत आला आहे. भ्रष्टाचार करणार नाही, पक्षही सोडणार नाही आणि मतदारांसाठी २४ तास उपलब्ध असू असे ‘आप’च्या उमेदवारांनी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले आहे. मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठीचे हे प्रतिज्ञापत्र राज्यात चर्चेचाच नाही तर कौतुकाचा विषय ठरला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. कंत्राटदारांनी अधिकारी किती पैसे घेतात याचाच पाढा वाचला आहे. पण कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाने भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याचे वचन मतदारांना दिल्याचे आम आदमी पक्षाच्या पदाधिका-यांनी स्पष्ट केले आहे. प्रभागात हे प्रतिज्ञापत्र पोहचवणार असल्याचे या उमेदवारांनी ठरवले आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्यावर भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही अशी ग्वाही ‘आप’च्या उमेदवारांनी दिली आहे. तर निकालानंतर तडजोडीच्या राजकारणात पडणार नसल्याचे ‘आप’ने या प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले आहे.
‘आप’चे १४ उमेदवार मैदानात
महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरात राजर्षी शाहू आघाडी मैदानात उतरली आहे. या आघाडीत आम आदमी पक्ष, शरद पवार यांची राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष आहेत. या आघाडीत आम आदमी पक्षाचे १४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे २३ तर वंचित बहुजन आघाडीचे ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोल्हापुरात इंडिया आघाडीत राष्ट्रवादीला डावलण्यात आल्याने हा तिस-या आघाडीचा प्रयोग होत आहे.

