कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. ऊस वाहतूक करणा-या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत सैन्य भरतीसाठी उतरलेल्या २ तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तरूणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते जागीच ठार झाले. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.
पारस आनंदा परीट (वय २१) आणि सुरेश ज्ञानदेव उंड्रीकर (वय २१) अशी मृत युवकांची नावे आहेत. दोघेही अंबर्डे शाहूवाडी येथील रहिवासी आहेत. दोघेही सैन्य भरतीसाठी गेले होते. तेथून गावी परत येत असताना कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील भाडळी खिंड हद्दीत हा भीषण अपघात घडला.
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील भाडळे खिंड येथून ऊस वाहतूक करणारा ट्रक जात होता. त्याच दिवशी तरूणही गावी परतत होते. दोघेही मोटारसायकलवरून परतत होते. यावेळी भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत तरूण मोटारसायकलवरून खाली पडले.
या धडकेत दोन्ही तरूणांच्या डोक्याला जबर मार बसला. दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम शिरसाठ, पोलीस हेडकॉन्स्टेबल कोगेकर, चालक माळी आणि महामार्ग पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पालखी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सैन्य भरतीसाठी गेलेल्या या दोन होतकरू युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गावक-यांनी या घटनेची चौकशी करून ट्रकचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

