कोल्हापूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. अर्वाच्य शिवीगाळ करणा-या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पाच दिवस झाले तरी पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल केला नाही.
संतप्त झालेल्या डाव्या संघटनांकडून ऐतिहासिक बिंदू चौक येथे गृहमंत्र्यांचा पुतळा जाळून, गृहखात्याचा निषेध करण्यापूर्वीच पोलिसांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा आंदोलकांकडून ताब्यात घेतला. मात्र यावेळी पोलिसांची आंदोलकांसोबत जोरदार झटापट झाली, या प्रकाराने संतापलेल्या आंदोलकांनी उद्या बुलडाण्यात आमदार गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य करून ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे, ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करूनही आमदार गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
याविरोधात आज कोल्हापुरातील डाव्या संघटनांच्या वतीने बिंदू चौकात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र उपस्थित पोलिसांनी आंदोलकांचा हा प्रयत्न हाणून पाडला, प्रतीकात्मक पुतळा घेऊन येणा-या कार्यकर्त्यांवर झडप घालून, पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला. यावेळी प्रचंड धक्काबुक्की आणि झटापट झाली. काही काळ गोंधळ निर्माण झाला होता, पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेतले, काही वेळाने आंदोलकांना सोडून देण्यात आले, या आंदोलनामुळे बिंदू चौक परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाच्या विक्रीत वाढ : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाच्या विक्रीत झपाट्याने वाढ झाली आहे. १९८८ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या ७२ पानांच्या या पुस्तकामध्ये गोविंद पानसरे यांनी स्पष्ट भूमिका मांडल्यामुळेच आजही या पुस्तकाला वाचकांनी पसंती दिली आहे. रोज पुस्तकाच्या ऑर्डरसाठी फोन येत आहेत, मागणी वाढत असल्याने जास्तीतजास्त पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सावू प्रकाशनचे प्रशांत आंबी यांनी सांगितले.

