लातूर : प्रतिनिधी
पावसाने पाठ फिरवली, पण शेतक-यांची जिद्द अजूनही कायम आहे. लातूरच्या चाकूर तालुक्यातील दापक्याळमध्ये एका शेतक-याचा असाच एक हृदय पिळवटून टाकणारा संघर्ष समोर आला आहे. हातावर हात धरून न बसता, पाण्याचा टँकर विकत आणून घागरीने टोमॅटोच्या रोपांना पाणी देण्याची वेळ या शेतक-यावर आली आहे.
निसर्गाची अवकृपा आणि आर्थिक अडचण या दुहेरी संकटात सापडलेले चाकूर तालुक्यातील दापक्याळ येथील शेतकरी मैनोद्दीन शेख यांचे एका एकरातील टोमॅटोचं पीक डोळ्यादेखत वाळूत असल्यामुळे त्यांनी हार न मानता टँकरने पाणी विकत आणले आणि कडक उन्हात अख्खं कुटुंब घागरीने एकेका रोपाला पाणी घालून पीक वाचवण्याची धडपड करत आहे. एककीकडे पावसाचा लपंडाव आणि टँकरच्या पाण्याचा अतिरिक्त खर्च सोसावा लागत असतानाच, दुसरं मोठे संकट उभे राहिले ते देणेकरण्याचे. जाणवळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शेख यांच्या खात्यावर स्वत:चे पैसे जमा आहेत. मात्र, पीककर्ज भरा असा तगादा लावत बँकेने त्यांना स्वत:चेच पैसे काढण्यापासून रोखले आहे. पीक वाचवण्यासाठी पैशांची नितांत गरज असताना बँकेच्या या भूमिकेमुळे मैनोद्दीन शेख पुरते अडचणीत सापडले आहेत.
















