लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील कोष्टगावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील नरहरी अंकुश डाके उर्फ ‘आबा’ यांनी ‘कोन बनेगा करोडपती’ (केबीसी) या सुप्रसिद्ध ज्ञानस्पर्धेत आपल्या बुद्धिमत्ता आणि चिकाटीच्या जोरावर तब्बल २५ लाख रुपये, इलेक्ट्रिक स्कूटी, दोन वर्षे लागणारे गोवर्धन तूप, तसेच इतर आकर्षक पारितोषिके जिंकून संपूर्ण लातूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
अत्यंत साध्या परिस्थितीत जीवन जगणा-या नरहरी डाकेंच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न भाजीपाला, दूध विक्री आणि आठवडी बाजारातून अवघे ८ ते १० हजार रुपये एवढेच. कर्जबाजारीपणाने दबलेल्या या कुटुंबाने अनेक कठीण प्रसंग झेलले. कधी गोठ्यातील म्हशी विकाव्या लागल्या, तर कधी कर्ज फेडण्यासाठी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकावे लागले. मात्र या सा-यावर मात करत नरहरी यांनी मोबाईल, युट्यूबचा अभ्यासासाठी योग्य उपयोग करून केबीसी मध्ये सहभागी होण्याचे स्वप्न साकार केले. दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाखाली झालेल्या थेट प्रक्षेपणात नरहरी यांचा उत्साह, आत्मविश्वास आणि ज्ञानाचा थरारक खेळ पाहून संपूर्ण सभागृह भावूक झाले. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची कहाणी ऐकून बिग बी सुद्धा काही काळ स्तब्ध झाले.
नरहरी यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा हातभार आहे. वडील अंकुश डाके वारकरी संप्रदायातून कीर्तन-प्रवचन करीत समाजजागृतीचे कार्य करतात. मोठे भाऊ अविनाश डाके आणि वहिनी वंदना डाके हे दिवेगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून कठीण काळात त्यांनीही मोठा आधार दिला. बारावीनंतर बी.एस्सीचे केवळ दोन वर्ष शिकूनही नरहरी यांनी प्रचंड मेहनतीने केबीसीचा सखोल अभ्यास केला व आज यशाच्या शिखरावर पोहोचले. या उल्लेखनीय यशानंतर कोष्टगाव, रेणापूर तसेच लातूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. अविनाश डाके यांच्या घरी काशीलिंगेश्वर नगर, अंबाजोगाई रोड येथे आयोजित सामूहिक सत्कार कार्यक्रमात प्रा. जयपाल पाटील फड, प्रा. डॉ. केशव आलगुले, विठ्ठल कुरमुडे, माऊली घुले, राम मुंढे, धोंडीराम चिल्लरगे, श्री.पांडुरंग सपकाळ सर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

