16.9 C
Latur
Sunday, November 9, 2025
Homeमहाराष्ट्रकौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

पुणे : प्रतिनिधी
जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार,नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना या अनिश्चित जगात कौशल्य मदतीला येऊ शकते.त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे.असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले
सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील,कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा,लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले.जनरल धीरज सेठ,विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार,आदी उपस्थित होते.

कौशल्य शिक्षण देशाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे असून कौशल्यप्राप्त व्यक्ती निर्मितीसाठी योगदान देतो.असे नमूद करून संरक्षणमंत्री सिंह म्हणाले,आजच्या युगात ज्ञान उपयुक्त नसून त्याचे उपयोजन करण्याची कला अवगत असणे महत्त्वाचे आहे. शिकलेल्या बाबींना जीवनात कसे आणावे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हेच शिक्षणाचे उद्दीष्ट असायला हवे.नवभारताकडे देश जात असताना स्कील इंडीया, स्टार्ट अप इंडिया आणि मेक इन इंडियावर भर देण्यात येत आहे.केंद्र सरकारने कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे.

या मंत्रालयाने या क्षेत्रातील आव्हानांना संधीत रुपांतरीत करण्याचा प्रयत्न केला आहे.प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत १ कोटी ६३ लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.जनशिक्षा संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकातील ३० लाखापेक्षा अधिक उमेदवारांना शिलाई,भरतकाम,हस्तकला,फळ प्रक्रिया आणि आरोग्य सेवा सहायकाचे प्रशिक्षण करण्यात आले आहे.प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील पारंपरिक कारागिरांना सक्षम करण्यात येत असून २२ लाख कारागिरांना व्यवसायाची आधुनिक साधने प्रदान करण्यात आली आहेत.असे ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतिक होते.असे नमूद करून ते म्हणाले, लष्कराने भारतात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करीत धैर्य आणि संयमाने पराक्रम गाजविला.संरक्षण साहित्य निर्मितीमध्ये भारतीय युवांनी मोठा पुढाकार घेतला असून गेल्या १० वर्षात आपली संरक्षण साहित्य निर्मिती ४६ हजार कोटी रुपयांवरून १ लाख ५० हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. यातही सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचे खासगी क्षेत्राचे योगदान आहे.२०२९ पर्यंत आपली उत्पादनक्षमता ३ लाख कोटींपर्यंत नेण्याचे आणि संरक्षण साहित्य निर्यात ५० लाख कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे,असेही ते म्हणाले.

स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या उद्घाटनाद्वारे नव्या युगातील महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल टाकल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्याचे महत्त्व लक्षात घेऊन देशात एक कौशल्य विकासाचे अभियान सुरू केले सिम्बायोसिसने कौशल्य विद्यापीठाची कल्पना समोर आणली. देशाला महासत्तेच्या रुपात समोर आणायचे असल्यास देशातील तरुणाईला कौशल्य प्रदान करून कुशल मनुष्यबळात रुपांतरीत करण्याची गरज आहे.या क्षेत्रासाठी आवश्यक व्यवस्था उभी करणा-या शिक्षणसंस्थांची संख्या मर्यादित आहे.विद्यापीठाचे कौशल्य विकासाचे हे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरले आहे.देश संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सातत्याने पुढे जात असताना महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.असे ते म्हणाले

कुलपती डॉ.मुजुमदार यांनी मनोगत व्यक्त केले .प्र.कुलगुरू डॉ.मुजुमदार यांनी प्रास्ताविकात विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमाची व अभ्यासक्रमाची माहिती दिली.संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते पदवी प्रदान समारंभात १ हजार ५३२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. २ विद्यार्थ्यांना कुलपती यांचे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. तसेच २ विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर पुरस्कार आणि एका विद्यार्थिनीला कुशल पुरस्कार प्रदान करण्यात आला.विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे उद्घाटन करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR