लातूर : प्रतिनिधी
आजच्या आधुनिक काळात संगणकशास्त्र या विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण असून संगणकशास्त्र या विषयात करिअरच्या भरपूर संधी आहेत. आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कौशल्य विकासावर जास्तीचा भर देण्यात आलेला आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी विषय ज्ञानाबरोबर कौशल्य विकासावर भर देणे ही आधुनिक काळाची खरी गरज आहे. दयानंद शिक्षण संस्था व दयानंद विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांना घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची शिस्त पाळून प्रामाणिकपणाने, जिद्दीने भविष्य घडविले पाहिजे, असे प्रतिपादनप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी केले.
दयानंद विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातर्फे इंडक्शन प्रोग्राम व बी.सी.एस.,डेटा सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, एआय,एमएल आणि एम.एस्सी.संगणकशास्त्र प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रोहिणी शिंदे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. जमन अंगुलवार, कार्यक्रम समन्वयक डॉ. गजानन बने, सिनेट सदस्य व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. महेश बेंबडे, एनईपी समन्वयक डॉ. युवराज सारणीकर, एनसीसी कॅप्टन डॉ. विजेंद्र चौधरी, ग्रंथपाल प्रा. किरण भिसे, विभाग समन्वयक डॉ. संगीता जाजू, डॉ. आण्णाराव चौगुले, डॉ. नाथराव केदार, प्रा. गोविंद बांगड, प्रा. सुजाता काळे, प्रा. समित जोशी, गौरी जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. शिंदे यांनी संगणकशास्त्र विभागाची २००८ पासूनची वाटचाल, विभागातील विविध कोर्सेसची माहिती, विविध उपक्रम कार्यशाळा, सेमिनार आणि विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन स्किल, प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी सातत्याने प्रयत्न केला जातो असे त्यांनी सांगितले. डॉ. सारणीकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या कौशल्यवाढीसाठी व विद्यार्थ्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व वाढीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे सांगितले. डॉ. बेंबडे यांनी क्रीडा विभागाच्या माध्यमातून घेतले जाणारे विविध खेळ,स्पर्धा व क्रीडा क्षेत्रात असलेल्या संधीविषयी सविस्तर माहिती सांगितली. डॉ. चौधरी यांनी एनएसएस,एनसीसी व युवक महोत्सव,सांस्कृतिक विभागाविषयी माहिती सांगितली. ग्रंथपाल प्रा. भिसे यांनी ग्रंथालय व कमवा आणि शिका याविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गजानन बने यांनी केले. सूत्रसंचालन आकांक्षा पाटील व प्रज्वल लामतूरे यांनी केले. तर आभार प्रा.वैभव कुलकर्णी यांनी मानले. यावेळी संगणकशास्त्र विभागातील प्रथम वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांबरोबर द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत इंडक्शन व स्वागत समारंभ कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. याप्रसंगी संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

