लातूर : प्रतिनिधी
९ ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेच्या वतीने शहरातील जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड आणि राजीव गांधी चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ‘स्वच्छ लातूर-सुंदर लातूर’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात आयएमएचे पदाधिकारी, डॉक्टर, स्थानिक नागरिक आणि स्वच्छता कर्मचा-यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अभियानादरम्यान रस्त्याच्या कडेला, दुभाजकात तसेच परिसरात पडलेला कचरा गोळा करण्यात आला. सुमारे चार ट्रॅक्टर कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये प्लास्टिक कच-याचे प्रमाण अधिक होते. उपस्थितांनी स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देणारे फलक हातात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृतीकेली.
‘प्रदूषणाचा भाग बनण्याऐवजी त्यावर उपाय बना’ आणि ‘प्लास्टिकला नाही म्हणा’ अशा घोषणा देत पर्यावरण रक्षणाचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करीत दर महिन्याच्या ९, १९ आणि २९ तारखेला होणा-या या स्वच्छता अभियानात नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या अभियानात आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. शिवकुमार जाधव, नगरसेवक रविशंकर जाधव, डॉ. सुबोध सोमाणी, डॉ. राजेश दराडे, डॉ. देवणीकर, डॉ. गणेश पवार, डॉ. वेदांत अवस्थी, डॉ. आकांक्षा अवस्थी, डॉ. वर्षा दराडे, डॉ. नेहा मंडादे, डॉ. श्वेता पवार, डॉ. पद्मसिंह बिरादार, डॉ. काळमे, डॉ. मन्सूर भोसगे, डॉ. चंद्रज्योती बांधखडके, डॉ. तृप्ती पाटील, डॉ. आमिर शेख, इम्रान शेख, सुभाष गुर्गावाड, श्रीकांत सावंत, प्रमोद हुडगे यांच्यासह अनेकांनी श्रमदान केले. आयएमएच्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.















