परभणी : जिल्ह्यात पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी राबवलेल्या गुन्हेगारीमुक्त परभणी या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारांचे पार धाबे दणाणले आहेत. अट्टल घरफोड्या आणि मुरूम माफियांवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आता क्राईम ब्रांचने आंतरजिल्हा केबल चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मानवत रोडवरील टाकळी नीलवर्ण शिवारात रचलेल्या चोख सापळ्यात ३ सराईत केबल चोर अलगद अडकले. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून छत्रपती संभाजीनगर, मानवत आणि बोरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
जिल्ह्यातील चोरी व केबल चोरीच्या गुन्ह्यांची पाळेमुळे उखडून फेकण्याचे कडक निर्देश पोलिस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिले होते. त्यानुसार क्राईम ब्रांचचे प्रमुख गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक मानवत रोड परिसरात गस्तीवर होते.
२ ऑक्टोबर रोजी गस्तीदरम्यान, टाकळी नीलवर्ण शिवारात काही इसम चोरीच्या केबलसह छुप्या रीतीने थांबले असल्याची पक्की खबर गुप्त बातमीदाराकडून मिळाली. बातमीची शहानिशा करताच क्राईम ब्रांचच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता टाकळी शिवारात कडक घेराबंदी करत धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या तीनही संशयितांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
बाबू उर्फ बाबुराव अण्णासाहेब शिंदे, सुनील शिवाजी शिंदे, लखन हिरामण धोत्रे या संशयितांकडे असलेल्या केबलबाबत पोलिसांनी खाक्या दाखवून कडक विचारपूस केली असता, त्यांनी ही केबल थेट शेंद्रा (छत्रपती संभाजीनगर) येथून चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी मानवत व बोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही केबल चो-या केल्याचे स्पष्ट झाले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले आणि क्राईम ब्रांच प्रमुख गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलिस उपनिरीक्षक सवंडकर, माणिक डुकरे, सूर्यकांत फड, विष्णू चव्हाण, सिद्धेश्वर चाटे, नामदेव दुबे, मधुकर ढवळे, राम पोळ व हनवते यांच्या पथकाने फत्ते केली.
गुन्हेगारांना पोलिसी इशारा
परभणी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणा-या आणि चोरी-घरफोडीत लिप्त असलेल्या एकाही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. क्राईम ब्रांचची ही झिरो टॉलरन्स मोहीम अशीच धडक रीतीने सुरू राहील, असा रोखठोक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
















