किनगाव : प्रतिनिधी
अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्री सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थ व महिलांनी संताप व्यक्त केला आहे. या अवैध दारूविक्रीविरोधात खंडाळी येथील नागरिक व महिलांनी एल्गार पुकारत आक्रमक पवित्रा घेत किनगाव पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन अवैध दारूविक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. गावामध्ये काही व्यक्तींकडून कोणत्याही परवानगीशिवाय अवैध दारूविक्री सुरू आहे. या दारूविक्रीमुळे गावातील तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात असून, दारूच्या सेवनामुळे कौटुंबिक वाद, भांडणे, सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
गावातील अवैध दारूविक्रीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, याप्रकरणी पोलिसांनी तातडीने चौकशी करावी. अवैध दारूविक्री करणा-या व्यक्तींवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच खंडाळी गावातील अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थ व महिलांनी स्वाक्षरीसह दिलेल्या निवेदनातून केली आहे. आता किनगाव पोलीस अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलतात आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करतात का, याकडे खंडाळी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
















