मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या कानाकोप-यात धावणारी ‘लालपरी’ रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अक्षरश: खिळखिळी झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात निकृष्ट बांधकाम केलेल्या बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून त्याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसला आहे.
मागील तीन महिन्यांत एसटी बसगाड्यांचे अपघात तसेच दुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या महामंडळावर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडला आहे. गतिमान विकासाचा दिखावा करणा-या सरकारच्या निष्क्रियतेची पोलखोल यातून झाली आहे.
एसटी महामंडळाच्या कार्यशाळांमध्ये टायर फिटर, इलेक्ट्रिशियन्स, वाहन निरीक्षक आदी पदांवर काम करणा-या कामगारांचे ३० ते ३५ टक्के मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे बसगाड्यांची देखभाल वेळेवर करणे मुश्कील बनले आहे. सध्या कार्यरत कामगारांवर देखभालीचा ताण पडला असून आगाऊ देखभाल करणे शक्य होत नाही.
















