लातूर : प्रतिनिधी
रासायनिक खतांचे मार्जिन व लिंकिंग, खतांची विक्री करताना थेट गुन्हा दाखल करणे आणि ‘साथी’ अॅपच्या माध्यमातून बियाणे विक्री अनिवार्य केल्याच्या निषेधार्थ दि. २७ एप्र्रिलपासून खत विक्री बंद करण्याचा निर्णय लातूर जिल्हा फर्टीलायझर्स, पेस्टीसाईडस अॅण्ड सीड्स डिलर्स असोसिएशने घेतला आहे. ऐन खरीपाच्या पेरणीच्या तोंडावर खत विक्री बंद झाल्याने शेतक-यांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे.
महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइडस सीड्स डिलर्स असोसिएशन ‘माफदा’ यांनी सोमवारपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. ‘माफदा’च्या या बंदला लातूर जिल्हा फर्टीलायझर्स, पेस्टीसाईडस अॅण्ड सीड्स डिलर्स असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. कृषी निविष्ठा विके्रत्यांना होणा-या त्रासाच्या विरोधात ‘माफदा’ने हा बंद पुकारला आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सीलबंद खतांची विक्री केली तरी त्यांच्याविरोधात थेट फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाते. खत विक्रेत्या कंपन्यांकडून लिकिंगची सक्ती केली जाते. साथी अॅपचा अग्रह, बनावट एचटीबीटी बियाणे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘माफदा’ने बेमुदत बंदची हाक दिली आहे. त्यास लातूरच्या खत विक्रेत्यांनी पाठींबा दिल्याने सोमवारी लातूर जिल् तील खत विक्री बंद होती.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी युरिया व डीएपी विक्री बाबतची गाईडलाईन्स स्पष्ट व लेखी स्वरुपात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही कोणताही डीएपी व युरिया उतरवून घेणार नाही व विक्री करणार नाही, असे निवेदन लातूर जिल्हा कृषी अधिकारी यांना लातूर जिल्हा फर्टीलायझर्स, पेस्टीसाईडस अॅण्ड सीड्स डिलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सोनवणे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने लातूर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या समोर जिल्ह्यातील युरिया व डीएपी विक्री करताना येणा-या अडचणींचा पाढा वाचला. भावातील तफावत व खत विक्रीबाबत स्पष्ट स्वरुपात नसलेल्या गाईडलाईन यामुळे शेतकरी ग्राहक व विक्रेते दुकानदार यांच्यात अनेकदा वाद होतात. यामुळे दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागतो.
शेतक-यांना योग्य दरात व वेळेवर खत मिळावे यासाठी खत विक्रेते मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करतात तरी ही अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करणा-या दुकानदारांना विनाकारण प्रशासकीय कार्यवाहीचा सामना करुन आपला व्यवसाय करावा लागतो, असे सांगुन जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी यांनी यांनी युरिया व डीएपी विक्रीबाबतची गाईडलाईन्स स्पष्ट व लेखी स्वरुपात दिल्यास शेतक-यांत व दुकानदारांमध्ये वाद होणार नाही. त्याच बरोबर खतांच्या दराबाबत गैरसमज निर्माण होणार नाही. यासाठी प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा व युरिया व डीएपी विक्री बाबतची गाईडलाईन्स स्पष्ट व लेखी स्वरुपात द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.
खत विक्रेत्यांचे आक्षेपाचे मुद्दे
अवैध एचटीबीटी बियाणे विक्री
कंपन्यांकडून होणारे लिंकिंग
अवैध कीटकनाशके व खतांची अवैध एजंटकडून विक्री
साथी अॅपच्या माध्यमातून बियाणे विक्री अनिवार्य
मुदत संपलेला माल परत न घेण्याची अट
बियाणे व कीटकनाशकांच्या विक्री संदर्भात नवीन नियम

