22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रखरीप हंगामाचे आर्थिक गणित कोलमडणार

खरीप हंगामाचे आर्थिक गणित कोलमडणार

हंगाम आणखी लांबणीवर शेतकरी चिंतेत

मसूर : प्रतिनिधी
कराड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून तळी निर्माण झाली आहेत. शेतातील पाण्याचा निचरा झाल्याशिवाय कोणतीही मेहनत करता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे यावर्षी खरीप हंगाम लांबणीवर पडणार आहे. आडसाली ऊस लागण रखडली आहे. मुख्यत: शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. दहा दिवस सलग पाऊस उघडला तरच शेतीची मशागतीची कामे करता येणार आहेत. हंगाम लांबणीवर जाणार असल्याने शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

तालुक्यात अवकाळी बेसुमार पाऊस पडला आहे. मे महिन्यात शेतात सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळाले. ज्या शेतक-यांनी शेताची नांगरट करून आडसाली ऊस लागण्यासाठी स-या सोडल्या. त्या पावसाने सपाट झाल्या आहेत. या स-या पुन्हा सोडण्यासाठी शेतक-याला शेतामध्ये घात आल्यानंतर व रोटर मारून मगच स-या सोडाव्या लागणार आहेत. प्रतिवर्षी मेच्या शेवटच्या व जूनच्या पहिल्या आठवड्यात आडसाली उसाची लागण केली जाते. यासाठी शेतकरी लागणपूर्व मशागतीची कामे आटपत असतो. त्यामुळे यावर्षीही अशी कामे आटपलेल्या शेतक-याला लागणीपूर्वीच दुप्पट खर्चाला सामोरे जावे लागणार आहे.

बेसुमार पावसामुळे शेती वाहून गेल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याचा निचरा होणारे शेत सोडले तर सर्व शेतामध्ये तळी झाल्याचे चित्र दिसते आहे. खरीप पूर्व शेतीची मशागत करताना नांगरणी केलेल्या शेतामध्ये शेणखत टाकून त्या शेतात रोटर मारावे लागते. परंतु, शेणखतच पावसाने वाहून गेल्याने शेतात पुन्हा शेणखत टाकावे लागणार आहे. या पावसाने आंबे झडल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

एप्रिलमध्ये ऊस लागण केलेली आहे, ती लागण चांगली उगवून आली आहे. त्या उसाला भरणी करता येणार नाही. उशिरा तुटलेल्या उसाची खोडवी ठेवलेल्या ऊस शेतीची आंतरमशागतीची कामे या अतिपावसामुळे होणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

भाताचे गणित बिघडणार
कराड तालुक्यात कृष्णा-कोयना नद्यांमुळे काठी भात पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. साधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस व रोहिणी नक्षत्राच्या दरम्यान भाताची पेरणी केली जाते. काही शेतकरी लागण पद्धतीने भात करण्यासाठी भाताची रोपे टाकत असतात. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या धुवांधार पावसामुळे भाताची रोपे टाकण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे यावर्षी भात पिकाचे गणितच बिघडणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR