उदगीर : बिभिषण मद्देवाड
पावसाने पाठ फिरविल्याने शेतीचे अर्थकारण कोलमडले, हाताला काम नाही आणि उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. अशा परिस्थितीत आता दुष्काळाच्या झळा गावोगाव भरणा-या आठवडी बाजारांनाही बसू लागल्या आहेत. शेतक-यांच्या हातात पैसा नसल्याने बाजारातील खरेदी-विक्रीवर परिणाम होत असून, दुसरीकडे भाजीपाला, धान्य, कडधान्ये आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट विस्कळीत केले आहे. बाजारात वस्तूंची उपलब्धता असली तरी त्या खरेदी करण्याची ऐपत मात्र अनेकांची राहिलेली नाही. त्यामुळे आठवडी बाजारात ग्राहकांची गर्दी आणि प्रत्यक्ष उलाढाल यामध्ये तफावत दिसून येत आहे.
पावसाअभावी भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून, बाजारातील आवक आणि मागणी यांच्यातील तफावतीमुळे अनेक वस्तूंचे दर वाढले आहेत. कांदा, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची, वांगी, भेंडी, कोथिंबीर आणि पालेभाज्यांच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. यासोबतच डाळी, कडधान्ये, ज्वारी, गहू आणि खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींमुळे रोजच्या जेवणाचेही बजेट वाढले आहे. आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेते, किरकोळ दुकानदार, फळविक्रेते, कपडे विक्रेतेआणि इतर छोट्या व्यावसायिकांची संख्या मोठी असते. मात्र ग्राहकांकडून पूर्वीप्रमाणे खरेदी होत नसल्याने या विक्रेत्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहक बाजारात येतात; मात्र गरजेपुरतीच खरेदी करून परततात. पूर्वी दोन-तीन पिशव्या भरून खरेदी करणारे ग्राहक आता खर्चाचा अंदाज घेऊन मोजक्या वस्तू घेत असल्याचे चित्र आहे.
















