मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. किती दिवसांचा इंधन साठा उरला यावरून द्वंद्व सुरू असतानाच अजून एक महागाईचा बॉम्ब पडणार आहे. खाद्यतेल महागण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमती पुन्हा भडकण्याची दाट शक्यता आहे. बायोफ्युएलची मागणी वाढली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात पाम तेलाच्या किमती रेकॉर्डब्रेक वाढल्या आहेत. मलेशियातील बाजारात पाम तेलाचा भाव ४,६०० रिंग्गित प्रति टन इतका आहे. वायदे बाजारात बायोफ्युएल धोरणामुळे व्हेजिटेबल ऑईलच्या, खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. जून महिन्यातही किमती वाढण्याची दाट शक्यता आहे.
जागतिक स्तरावर मलेशिया आणि इंडोनेशिया हे दोन देश पाम तेल पुरवठ्यातील अव्वल निर्यातदार आहेत. एप्रिल महिन्यात पाम तेलाच्या किमती ४,८०० रिंग्गित प्रति टनावर पोहोचल्या होत्या. हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. त्यानंतर किमतीत घसरण झाली होती. आता मागणी अधिक आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती असल्याने पाम तेलाच्या किमती भडकल्या आहेत.
मलेशिया पाम ऑईल एलायन्स आणि मलेशियन पाम ऑईल बोर्डाच्या ताज्या आकडेवारीनुसार जून महिन्यात कच्च्या पाम तेलाच्या किमती सरासरी ४,४०० प्रति टनाच्या जवळपास आहेत. मार्च ते ऑक्टोबर हा कालावधी पाम तेल उत्पादनासाठी सर्वांत अनुकूल मानल्या जातो. या दरम्यान पाम तेलाचे उत्पादन सर्वाधिक होते. फळातून अधिक प्रमाणात तेल काढल्या जाते. पण यंदा एप्रिल महिन्यात मलेशियातील पाम तेलाच्या साठ्यात अगदी किरकोळ वाढ झाली आहे. पाम तेल साठा अवघा २.३१ दशलक्ष टनावरच पोहोचू शकला आहे.
अमेरिकेच्या खेळीने महागले पाम तेल
पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीच्या किमती अमेरिकन धोरणामुळे भडकल्या आहेत. जगात अस्थिरता निर्माण करण्याचे काम अमेरिकेकडून करण्यात येत असल्याचा आरोप इराणसह इतर देश करत आहेत. अमेरिकेच्या खेळीमुळे पाम तेल महागले आहे. अमेरिकेत बायोफ्युएल क्षेत्रात सोयाबीनची मोठी मागणी होत आहे. सोयाबीन तेलाच्या किमतीत युरोपमध्ये मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२२ नंतर या किमती वाढल्या आहेत. जगभरात सोयाबीन तेलाच्या किमती भडकल्या आहेत. त्यामुळे पाम तेलाला अधिक मागणी आली आहे. पाम तेलाचे कमी उत्पादन झाल्याने सध्या किमती कडाडल्या आहेत.
















