26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeअंतरराष्ट्रीयखामेनी सरकारविरोधात इराणमध्ये तीव्र आंदोलन

खामेनी सरकारविरोधात इराणमध्ये तीव्र आंदोलन

तेहरान : वृत्तसंस्था
इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन उसळले आहे. इराणच्या जनरेशन झेडचे तरुण सरकारविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. अनेक शहरांमध्ये हिंसक परिस्थिती असून लोक सरकारविरोधी घोषणाबाजी करत आहेत. यामुळे इराणमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिकन डॉलरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून इराणी चलन रियालची तीव्र घसरण झाली आहे. याच्या निषेधार्थ ही निदर्शने सुरु आहेत. लोकांनी बाजारपेठा बंद ठेवल्या असून रस्त्यांवर, चौकामध्ये आणि विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये धाव घेतली आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये ग्रँड बाजार, कमर्शियल सेंटर आणि अलादीन मॉल बंद करण्यात आले आहेत. सध्या निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र निदर्शकांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला आहे.

या निदर्शनांमध्ये महागाई आणि आर्थिक समस्यांविरोधात घोषणा दिल्या जात आहेत. अनेकांनी हुकूमशहाला मृत्यूदंडाच्या आणि देशाचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्याविरोधात घोषणा दिल्या. सध्या डॉलरची किंमत १४४,००० तोमनपर्यंत पोहोचली आहे. परंतु याच्या तुलनेत इराणचे चलन रियाल कमी झाले आहे. यामुळे व्यवसायात अनिश्चितता निर्माण झाली आहे.

इराणमध्ये सध्या तरुण पिढीचा असंतोष उघडपणे रस्त्यावर व्यक्त होत असून, नेपाळ, मादागास्कर आणि मोरोक्कोनंतर आता इराणमध्येही ‘जेन झी’ पिढी आंदोलनाच्या केंद्रस्थानी आली आहे. राजधानी तेहरानमध्ये तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, ‘ही अंतिम लढाई आहे’ अशा घोषणा देत ते सत्ताधा-यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. हे आंदोलन थेट सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या विरोधात केंद्रित असल्याचे दिसून येत असून, राजकीय व्यवस्थेतील बदलांची मागणी जोर धरत आहे.

सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी, वाढती महागाई आणि रोजगाराच्या संधींचा अभाव यामुळे तरुण वर्गात तीव्र असंतोष साचत गेला आहे. सुरुवातीला तेहरानमधील आर्थिक संकटाने त्रस्त झालेले दुकानदार आणि व्यापारी रस्त्यावर उतरले होते; मात्र कालांतराने या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून समाजातील विविध स्तरांतील नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR