मुंबई : प्रतिनिधी
खारघर प्रभाग क्र. पाचमधील प्रभाग रॅली दरम्यान निवडणूक आयोगाच्या कर्मचा-यांना मारहाण केल्याची घटना ताजी असताना ९ जानेवारी रोजी पुन्हा खारघरमध्ये निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकावर झालेल्या गैरवर्तनामुळे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हिरानंदानी परिसरात नेमणूक असलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकावर तपासणीदरम्यान शिवीगाळ करण्यात आली असून चित्रीकरणासाठी वापरण्यात येणा-या कॅमे-याची तोडफोड केल्याची गंभीर घटना सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात संबंधित मुलीवर भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी हिरानंदानी परिसरात जनार्दन पोपट सरडे आणि त्यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. सायंकाळी सहानंतर रस्त्यावरून जाणा-या वाहनांची तपासणी सुरू असताना सुमारे ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पांढ-या रंगाची इर्टिगा कार (एमएच ४६ बीक्यू ७५७९) या ठिकाणी आली. वाहन संशयास्पद वाटल्याने पथकाने तपासणीसाठी गाडी थांबवली आणि नियमाप्रमाणे तपासणी सुरू केली. या वेळी चित्रीकरणासाठी उपस्थित असलेले पियाशू पांडे यांना तपासणीचे चित्रीकरण करण्याचे आदेश देण्यात आले.
तपासणी सुरू असतानाच गाडीतून उतरलेल्या एका महिलेने अचानक आक्रमक भूमिका घेत कर्मचा-यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तुमची लायकी आहे का आमची गाडी तपासण्याची’ अशा शब्दांत वाद घालत तिने चित्रीकरण सुरू असलेल्या पांडे यांच्या हातातील कॅमेरा ओढून घेतला आणि रस्त्यावर आपटला. या प्रकारात कॅमे-याची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली असून कॅमेरा फुटल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

