मुंबई : प्रतिनिधी
मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबंधित अधिका-यांची समिती गठित करावी. या समितीने मुंबईमधील खासगी कोचिंग क्लासची तपासणी करून १५ दिवसांत अहवाल सादर करावा असे, निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता खासगी क्लासेसकडून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाणे, मुंबईत अॅलन क्लासेसच्या अनेक शाखा कार्यरत असणे, यासंदर्भात पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये विधान परिषद सदस्य राजेश राठोड यांच्या लक्षवेधीबाबत सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात नुकतीच बैठक झाली.
या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार राजेश राठोड, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात तसेच राज्यात अनेक खासगी कोचिंग क्लास सुरू आहेत. क्लास सुरू असलेली जागा, क्लासच्या ठिकाणी अग्निसुरक्षा, पार्किंग याबाबतची व्यवस्था, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून मोठे शुल्क आकारून कमी रक्कम दाखविणे आणि यात कर चोरी करणे, निवासी संकुल परवानगी असलेल्या इमारतीत खासगी क्लास सुरू करणे आणि अनधिकृत बांधकाम याबाबतची सर्व तपासणी करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणा-या शुल्काबाबतही संबंधित विभागाने तपासणी करावी, असे निर्देश विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
















