नवी दिल्ली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. त्यांनी आज त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी लोकांना कॉल किंवा मेसेज न करण्याची विनंती केली आहे.
सुप्रिया सुळे यांना जेव्हा आपला फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचे समजले त्यानंतर त्यांनी ताबडतोब विनंती केली की लोकांनी त्यांना कॉल करणे किंवा एसएमएस करणे टाळावे. या प्रकरणावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्याचेही सुळे यांनी सांगितले.
माझा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाले आहेत. कृपया मला कॉल करू नका किंवा मजकूर पाठवू नका. मी मदतीसाठी पोलिसांकडे पोहोचले आहे, अशी पोस्ट खासदार सुळे यांनी एक्सवर केली आहे. यासोबतच शरद पवार गटाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हॅकिंगबाबत पोलिसांत ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे.