लातूर : प्रतिनिधी
या समाधान शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर, ऑनलाईन सातबारा, फेरफार, ई-पीक पाहणी, अपूर्ण नोंदी दुरुस्ती, क्यआर कोडयुक्त ७/१२ उतारे, निराधार योजना, एक खिडकी योजना सेवा आदी विविध सेवा नागरिकांना जागेवर उपलब्ध करून देण्यात आल्या. अनेक प्रलंबित महसुली प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात आला.
गंगापूर (कन्हेरी महसूल मंडळ) ता. जि. लातूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत समाधान शिबिर बालाजी मंदिराजवळील मुख्य चौकात आयोजित या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. भारत बाष्ठेवाड, उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार गणेश सरोदे, गट विकास अधिकारी सतीश चोरमले, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग पंचायत समिती, आरोग्य विभाग, वन विभाग, पशुसंवर्धन विभाग, महावितरण, भूमी अभिलेख विभाग, आधार कार्ड सेवा केंद्र, निवडणूक विभाग आदींचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती, दुरुस्ती व मार्गदर्शन याचा लाभ ग्रामस्थांनी घेतला.
या शिबिरामध्ये १०० ते १५० लाभार्थ्यांना विविध दाखले व प्रमाणपत्रांचे जागेवरच वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. बाष्ठेवाड यांच्या हस्ते अनेक लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शेतक-यांना ट्रॅक्टरचे वाटप तसेच विविध शासकीय योजनांअंतर्गत लाभार्थी कार्डांचे वितरण करण्यात आले. मंडळातील सर्व गावांना गाव नकाशांचेही वाटप करण्यात आले. याचबरोबर दहावी परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावपातळीवरच त्वरित सेवा मिळाल्याने नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फे-या माराव्या लागल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. ‘समाधान शिबिर’ हे नाव ख-या अर्थाने सार्थ ठरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
















