निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील आंबेगाव (मसलगा) येथे शेतात साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला बुधवारी (दि. २१) रात्री सुमारे ९ वाजता आग लागून जवळपास ६० कट्टे सोयाबीन जळून खाक झाले. निलंगा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने आणखी २० कट्टे सोयाबीन वाचविण्यात यश आले. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आंबेगाव येथील गट क्रमांक २४ मध्ये बालाजी विनायक भालके आणि कमलाकर विनायक भालके यांच्या शेतात काढणी केलेले सोयाबीन साठवून ठेवले होते. रात्री अचानक आग लागल्याने सोयाबीनच्या गंजीने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यिाचे प्रयत्न केल्याने काही सोयाबीन वाचले; मात्र ६० कट्ट्यांचे नुकसान झाले. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणा-या शेतक-यांना या घटनेने मोठा फटका बसला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आग लावण्यामागे अज्ञात व्यक्तीचा हात असल्याचा संशय आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
















