लातूर : प्रतिनिधी
मुरूड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका सेवेतील हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यूत करंट लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी लातूरकडे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून हलविण्यात येत असताना काही अंतरावरच रुग्णवाहिकेचा एक महत्त्वाचा भाग अचानक गळून पडला. या प्रकारामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तेव्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवत त्या गंभीर रुग्णाला मदत केली.
या जीवघेण्या परिस्थितीत योगायोगाने घटनास्थळी उपस्थित असलेले युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुकेश सवासे, उपाध्यक्ष सुरज कांबळे व समाधान गायकवाड यांनी तत्परता दाखवत तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वेळ न दवडता खासगी रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि पत्रकार मनोज जोशी यांच्या सहकार्याने संबंधित रुग्णाला सुरक्षितपणे लातूरकडे रवाना केले. या युवकांनी दाखवलेली संवेदनशीलता, जबाबदारी आणि माणुसकी ही कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त करत माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. अशा प्रसंगी पुढाकार घेणारे युवक समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ग्रामीण भागातील रुग्णवाहिकांची सखोल तांत्रिक तपासणी करावी, दोषींवर कडक कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी धिरज विलासराव देशमुख यांनी केली आहे.

