मुंबई : प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मलेरियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या ७ दिवसांत गडचिरोली जिल्ह्यात मलेरियामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मलेरियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.
दरम्यान, धानोरा तालुक्यातील सिन्सूर (मोहली) गावातील एका तरुणाचा शनिवारी (दि. १२) मलेरियाने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कपिल नामदेव पदा (२५) असे मृत रुग्णाचे नाव आहे. विशेष म्हणजे, गेल्या ७ दिवसांत गडचिरोली जिल्ह्यात मलेरियामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मलेरिया रुग्णांच्या मृत्यूची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.
१२ दिवसांत आढळले १०० रुग्ण
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यांतर्गत येणा-या कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या १२ दिवसांत १०० हून अधिक रुग्णांना मलेरियाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आरोग्य यंत्रणा औषधांच्या माध्यमातून मलेरिया पॉझिटिव्ह लोकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी माहिती डॉ. स्वप्निल चोरुडे यांनी दिली.

