मुंबई : प्रतिनिधी
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र तयारी सुरू आहे. अशात मनसे नेते अमित ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अमित ठाकरे यांनी २७ ऑगस्टपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या कालावधीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करणारे पत्र दिले.
दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि मुंबई शहराचे टाऊन प्लॅनिंग यासंदर्भात ही भेट होती. त्यानंतर आज, शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी मनसे नेते अमित ठाकरे यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली. आशिष शेलार यांच्या वांद्र्यातील कार्यालयात ही भेट झाली. या भेटीदरम्यान, गणेशोत्सव कालावधीत होणा-या परीक्षांबाबत चर्चा झाल्याची माहिती अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी २७ ऑगस्टपासून सुरू होणारा गणेशोत्सव सर्वांनी आनंदात साजरा केला पाहिजे. अनेकजण कोकणातून येत असतात. गावाला जाणा-यांचीही संख्या मोठी असते. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीतील सर्व परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी आम्ही केली, असे अमित ठाकरे म्हणाले.

