मुंबई : प्रतिनिधी
सत्ताधारी महायुतीमधील भाजप मंत्री नितेश राणे यांनी गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटले आहे. या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मंत्री राणे यांच्यापेक्षा वेगळी भूमिका मांडली आहे. एकप्रकारे मंत्री राणेंच्या भूमिकेला छेद देणारी प्रतिक्रिया दिली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास विरोध केला होता. जर मुस्लिमांना गरब्यामध्ये यायचे असेल तर त्यासाठी धर्मांतराची अट घातली होती. यावर विरोधक तसेच काही मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतला होता. यामुळे गरबा-दांडियावरून महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले आहे. अशामध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याबाबत एक मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे.
अमृता फडणवीस यांनी, ‘गरबा सर्वसमावेशक उत्सव असून, तो पाहण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी मुस्लिम व्यक्ती येत असेल, तर त्यात गैर काहीही नाही,’ अशी भूमिका मांडली. चंद्रपुरातील महाशिवलिंग मंदिरात आयोजित रुद्राभिषेकासाठी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी गरबा, दहीहंडी, सार्वजनिक उत्सव आणि डीजेच्या वापराबाबतही भूमिका स्पष्ट केली.
गरबा सर्वांसाठी खुला उत्सव आहे. एखादी मुस्लिम व्यक्ती गरबा पाहण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी येत असेल, तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही, असे फडणवीस म्हणाल्या. श्रद्धा, धर्माचे पालन घरात करावे, सार्वजनिक ठिकाणी मात्र सर्वांनी सामाजिक सलोखा आणि नियमांचे भान ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दहीहंडी उत्सवात महिलांच्या सहभागाबाबत संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महिला मानवी मनोरा उभारून दहीहंडीत सहभागी होत असतील, तर ते समानतेचे प्रतीक आहे. मात्र, महिलांना अयोग्य पद्धतीने नृत्य करण्यास प्रवृत्त करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
धर्म आणि श्रद्धा जपताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगत अमृता फडणवीस यांनी डीजेवर पूर्ण बंदी घालण्याची गरज नाही, तर नियमानुसार ठरवून दिलेल्या मर्यादेतच तो वाजवला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वहिनींच्या भूमिकेचे स्वागत :
विजय वडेट्टीवार
दांडियाबद्दल अमृता फडणवीस यांनी चांगला विचार मांडला आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगून विष ओकणा-या नितेश राणेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढले तर त्यांच्या बोलण्यात काही तथ्य आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
राणेंचे काऊन्सिलिंग केले पाहिजे : संजय राऊत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गरब्यातील मुस्लिमांच्या प्रवेशावर घेतलेल्या भूमिकेचे जाहीर स्वागत केले. ‘मी अमृता वहिनींच्या भूमिकेचे स्वागत करतो. पण त्यांनी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील बोगस हिंदुत्ववादी लाडक्यांचे काऊन्सिलिंग केले पाहिजे. असे म्हणत त्यांनी नाव न घेता मंत्री नितेश राणेंवर निशाणा साधला.
















