नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वायुप्रदूषण फक्त फुफ्फुसांनाच नाही, तर महिलांच्या प्रजनन क्षमतेवर आणि गर्भावस्थेवरही गंभीर परिणाम करत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये वाढणा-या गर्भपाताच्या घटनांनी चिंता वाढली आहे.
लोकांना आतापर्यंत वाटत होते की, प्रदूषण फक्त आपल्या फुफ्फुसांना, श्वसन संस्थेला आणि हृदयाला आजारी बनवते. पण एका संशोधनानुसार, प्रदूषण महिलांच्या आणि पुरुषांच्या प्रजनन क्षमतेलाही प्रभावित करते. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे प्रदूषणामुळे महिलांच्या गर्भधारणेवर गंभीर परिणाम होत आहेत आणि हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषित हवा आणि अत्यंत वाढलेला ‘एक्यूआय’ यामुळे महिलांमध्ये मिसकॅरेजचे प्रमाण वाढत आहे, ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. दिल्ली शिवाय अन्य सामान्य शहरातील अधिक वर्दळीच्या किंबहुना वायुप्रदूषण असलेल्या भागात वास्तव्यास असलेल्या गरोदर महिलांतील मिसकॅरेजचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
भारतामध्ये दिल्ली-एनसीआर हा परिसर प्रदूषणाने अत्यंत त्रस्त क्षेत्रांपैकी एक आहे. अनेक डॉक्टरांच्या मते, येथे गरोदर महिलांची संख्या हॉस्पिटलमध्ये वाढत चालली आहे. या गरोदर महिला सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या घेऊन येत आहेत. या कारणामुळे अनेक ‘आयव्हीएफ’ सर्जरी रद्द कराव्या लागत आहेत, कारण महिलांमध्ये संसर्ग व सर्दी सातत्याने वाढत आहे.
जिथे वायुप्रदूषण जास्त असते अशा ठिकाणी राहणा-या महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाचा धोका वाढतो, ज्यामुळे मासिक पाळीत अनियमितता निर्माण होऊ शकते. पीएम २.५ आणि ठड2 (नायट्रोजन डाय ऑक्साईड) यांसारखे प्रदूषक प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या हार्मोन्सवर वाईट परिणाम करतात आणि प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होतो.
‘एएमएच’ हार्मोनवर परिणाम
एका संशोधनानुसार एखादी महिला दीर्घकाळ प्रदूषित वातावरणात राहत असेल तर तिच्या शरीरातील एंटी-म्युलरियन हार्मोन (एएमएच) चे प्रमाण कमी होते. ‘एएमएच’ हार्मोन हे ओव्हरीमध्ये किती अंडे शिल्लक आहेत हे दर्शवते. जर ‘एएमएच’चे प्रमाण कमी झाले तर ओव्हरीमध्ये फारच कमी अंडे उरली आहेत, म्हणजेच प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम होतो. पीएम २.५, पीएम १०, पीएम १ आणि नायट्रोजन डाय ऑक्साईड (ठड2 ) यांचे प्रमाण जास्त असेल तर शरीरातील एंटी-म्युलरियन हार्मोन आपोआप कमी होते.

