लातुरात आगीची आठवड्यातील दुसरी घटना
लातूर : प्रतिनिधी
लातूर येथील गांधी मार्केटमधील कल्याण पाठक यांच्या जयलक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्सच्या गोडावूनला रविवारी रात्री १० ते ११ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मोबाईल, वायर प्लास्टिकचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जागेवरच जळून खाक झाल्या. दरम्यान, आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे दुकानातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. लातूर शहरातील आठवडाभरातील आगीची ही दुसरी घटना आहे.
लातूर शहरातील गांधी मार्केटमध्ये कल्याण पाठक यांचे जयलक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे. या दुकानाच्या गोडावूनला रविवारी रात्री १० ते ११ च्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली असल्याचे सांगण्यात आले. आग लागताच तातडीने अग्निशमन दलाला कळविण्यात आले. परंतु तोपर्यंत आगीचा प्रचंड भडका उडाला होता. दुकानातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. तसेच धुराचे लोटही आकाशात पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत गोडावूनमधील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, वायरसह इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे दुकानमालकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, मोठ्या आगीची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. या अगोदर मागच्या सोमवारी स्क्रॅप मार्केटमधील दुकानांना आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
बघ्यांच्या गर्दीमुळे
मदतकार्यात अडथळा
आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढली. विशेष म्हणजे थेट रस्त्यावरच दुचाकी सोडून आगीची घटना पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढली होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी येण्यास खूप कसरत करावी लागली. त्यामुळे अशा बघ्यांना कोण रोखणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
















