पाथरी : गुंज वितरिकेला पाणी सोडून १० दिवस झाले आहेत परंतू शेवटच्या टोकावरील शेतक-यांपर्यंत पाणी पोहोचलेले नाही. पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यामुळे या विरोधात जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्रमांक ६ च्या कार्यालयासमोर बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी शेतक-यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणात भारत फुके, मुंजाभाऊ धर्मे, आजिम शेख, गोविंद पवार आणि बळीराम आव्हाड यांच्यासह परिसरातील संतप्त शेतकरी सहभागी झाले आहेत. पाण्याअभावी इतर पिकेही करपली आहेत आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. मसला मायनर-२ पर्यंत गेट नसणे, अनेक ठिकाणी ४ इंच पाईप टाकणे, कॅनल फोडणे, सुमारे २०० इलेक्ट्रिक मोटारींद्वारे होत असलेला बेकायदेशीर पाणी उपसामुळे शेवटच्या शेतक-यांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
टेलच्या टोकाच्या शेतक-यांची अडचण तात्काळ न सोडवल्यास आणि पिकांचे नुकसान झाल्यास पाटबंधारे कार्यालय जबाबदार राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात याकडे परिसरातील सर्वांचे लक्ष लागले आहे.
















