लातूर : प्रतिनिधी
तंबाखूमुक्त लातूर जिल्हा करण्यासाठी सरसावलेल्या प्रशासनाचे अवसान गळाल्याने अख्खी प्रशासकी इमारत गुटखा, तंबाखूच्या पिचका-यांनी रंगली आहे. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा व तंबाखू खाऊन थुंकणे ही एक गंभीर समस्या लातूरमधये बनली असून, या सवयीमुळे होणा-या अस्वच्छतेवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे निर्व्यसनी व्यक्तींची होणारी कुचंबना थांबता थांबत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुर्वेस भव्य, दिव्य प्रशासकीय इमारत आहे. या इमारतीत शासनाची विविध कार्यालये आहेत. माहिती जनसंपर्क कार्यालय सुद्धा याच इमारतीत आहे. परंतु, या इमारतीची अजब त-हा आहे. या इमारतीच्या प्रवेशद्वारावरच स्वागत होते ते मुत्रदुर्गंधीने. त्यामुळे तेथूनेच नाक मुरडत प्रवेश करावा लागातो. आत गेल्यास इमारतीचे कोपरे, जीन्याचे कोपरे, भींती सर्वच ठिकाणी गुटखा, तंबाखूच्या पिचका-यांची सुटलेली दुर्गंधी आणि रंगलेल्या भिंती दिसून येतात.
प्रशासकीय इमारतीत वर्ग-१ चा दर्जा असलेल्या अधिका-यांची अनेक कार्यालये आहेत. या कार्यालयाच्या संपूर्ण भींती पान, गुटखा, तंबाखूच्या पिचका-यांनी रंगलेल्या असताना वर्ग-१ चा दर्जा असलेल्या अधिका-यांना त्यावर काहींच उपाययोजना करता येत नाहीत काय? एवढ्या दुर्गंधीत हे अधिकारी आणि कर्मचारी ८ तास काम कसे करतात. जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग लातूरच्या वतीने कार्यालया बाहेर ‘सुस्वागत’, असे फलक लावलेले आहे. या कार्यालयात येणा-या नागरिकांचे सुस्वागत, परंतु, पान, गुटखा, तंबाखू खावून पिचका-या मारणा-यांनी स्वत:च्या सुस्वागतमवरच पिचारी मारली. प्रशासकी इमारतीत वर जीण्याचा कोपरा पिचका-या मारुन घाण करण्यात आला. कोणी तरी कोणाच्या तरी आदेशावरुन ‘येथे थुंकू नये’, अशी चिठ्ठी डकवली. आता एवढ्याश्या चिटोरीवरील आदेशावरुन येथे थुंकणार नाहीत ते पिचकारी बहादर कसल.े चिटोरीवरील आदेश डोळ्यांनी वाचत वाचत अनेकांनी पिचकारी मारली. धन्य त्या चिटोरीवर अद्याप तरी कोणी पिचारी मारली नाही.
















