14.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeलातूरगुटख्याची अवैध विक्री करणा-यावर गुन्हा दाखल

गुटख्याची अवैध विक्री करणा-यावर गुन्हा दाखल

लातूर : प्रतिनिधी
शहरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पानमसाल्याची अवैध विक्री करणा-या व्यापा-यावर लातूर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली असून, या कारवाईत एकूण ६ लाख ३६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी अवैध धंदे, विशेषत: प्रतिबंधित वस्तूंची विक्री, यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाला दि. ३ नोव्हेंबर रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली की, गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील गुळ मार्केट ते सम्राट चौक मार्गावर असलेल्या एका व्यापारी संकुलातील एका दुकानात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैध विक्री सुरू आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ कारवाई करत छापेमारी केली असता, नितीन माणिकराव कावळे (रा. आनंदनगर, लातूर) हा व्यक्ती महाराष्ट्र शासनाने विक्री, व्यवसाय आणि सेवनासाठी बंदी घातलेल्या विविध कंपनींचा गुटखा व पानमसाला  साठवून ठेवून विक्री करत असल्याचे आढळले.
या कारवाईत एकूण तीन लाख ३६ हजार १०० रुपये किमतीचा गुटखा व पानमसाल्याचा साठा, आणि तीन लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण ६ लाख ३६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस त्वरित अटक करून त्याच्याविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाणे, लातूर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार युसुफ शेख, रामहरी भोसले, विशाल गुंडरे, यशवंत घुगे, नराळे, श्रेणी पो. उपनिरीक्षक सोनकांबळे, चामे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR