मुंबई : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आता त्यांच्या आईनेच शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सदावर्ते मराठवाड्याच्या दौ-यावर असून, काल २२ सप्टेंबर रोजी जालन्यात त्यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांच्या मातोश्रींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गुणरत्न कायद्याने बोलतो परतु आता त्याला शांत राहण्याचा सल्ला देणार आहे असे म्हणाल्या.
सदावर्ते यांच्या मातोश्री म्हणाल्या, माझा मुलगा गुणरत्न कायद्याने बोलतो, तो वकील आहे. त्यामुळे त्याला कायद्याची भाषा करावीच लागेल. आई म्हणून मी त्याला शांत राहण्याचा सल्ला देईन. माझा मुलगा माझी प्रत्येक गोष्ट ऐकतो. तो माझ्या आज्ञेच्या पुढे जात नाही.
गुणरत्न सदावर्ते हे रविवारी २१ सप्टेंबर रोजी जालन्यात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालन्यात दीपक बो-हाडे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी येत असताना, रविवारी नागेवाडीजवळ त्यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. तसेच मंठ्यात मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांना काळे झेंडे दाखवले. या घटनेनंतर कोणतीही महत्वाची गोष्ट हाती घेतल्यानंतर अडथळे आणण्याचे प्रयत्न होतात. संविधानाची माहिती नसलेले लोक हल्ले करतात, अशी टीका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
मला त्या घोषणाबाजीचे वाईट वाटलेले नाही. आमच्या काहीतरी सुधारणा करत आहेत का? हे मी जाणले. दुश्मन जरी असला आणि तो चांगल्या गोष्टींबद्दल बोलतोय आणि आमच्याकडून चूक होत असेल, तर ती आम्हाला मान्य करावी लागेल. मी कोणत्याही विषयावर जे खरे असेल, ते बोलते. माझे वय झालेले आहे. त्यामुळे खोटे बोलून काय मिळणार? असे सदावर्ते यांच्या मातोश्री म्हणाल्या.
















