सेलू : शहरातील विवेकानंद विद्यालय येथे विविध स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. शिष्यवृत्ती परीक्षा, श्रेया स्पर्धा परीक्षा, मंथन स्पर्धा परीक्षा, एन. एम. एम. एस. परीक्षेत शिष्यवृत्ती धारक व उल्लेखनीय कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला कौतुकाची थाप मिळाली.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कान्हेकर, उद्योजक नवलकिशोर काबरा, पुष्पा काबरा, स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर, मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांची उपस्थिती होती. स्व. रामप्रसाद काबरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काबरा परिवाराच्यावतीने विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात आले.
शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने, सातत्याने आणि जिद्दीने मिळविलेल्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे त्यांच्या परिश्रमासोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यालयाच्या संस्कारक्षम वातावरणाचे फलित असल्याचे मान्यवरांनी सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळून त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होण्यास मदत होते, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
सूत्रसंचालन स्वप्नाली देवडे, प्रास्ताविक नामदेव एकशिंगे, यादीवाचन रागिणी जकाते, पद्य सोनाली जोशी, आभार अनिल कौसडीकर यांनी मानले. सत्कारामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद आणि आत्मविश्वास झळकताना दिसून आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
















