अभिजित दिपके यांचा इशारा
नवी दिल्ली : प्रतिनिधी
केंद्रातील मोदी सरकारच्या आश्वासनानंतर आणि केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतरमंतरवरील कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, सरकारकडून अद्याप आंदोलक विद्यार्थी आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. चौकशी केली जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांना सोडून देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पोलिसांकडून अद्यापही विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला.
देशातील काही राज्यात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या जात आहेत, त्रास दिला जात आहे. पोलिस विद्यार्थ्यांना ताब्यात घेत आहेत, अटक करण्याची धमकीही दिली जात आहे. सरकारने हे तात्काळ थांबवावे अन्यथा कॉकरोच जनता पार्टी पुन्हा मोठे आंदोलन उभा करेल, असे दिपके म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश क्र. ४ मध्ये सरकारांना विद्यमान एफआयआर चालू ठेवण्याची आणि तपास करण्याची परवानगी दिली आहे, हे अत्यंत गंभीर आहे, असे सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटले. अशा स्थितीत सरकारने जे आश्वासन दिले आहे, ते पाळायला हवे, असेही दास म्हणाले.
















